मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
लाडबोरी गावातील महाबीजच्या धान बिजोत्पादन योजनेत सहभागी झालेल्या 19 शेतकऱ्यांपैकी 10 शेतकऱ्यांचे धान प्रारंभीच्या तपासणीत नापास ठरल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. महाबीजने या शेतकऱ्यांना आगाऊ दिलेली 1,600 रुपये प्रति क्विंटल रक्कम परत करून धान परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ही रक्कम परत करणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत शोभाताई फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाबीजकडून संबंधित धानाची फेरतपासणी करण्यात आली. फेरतपासणीत धान निकषांनुसार पात्र ठरल्याने संबंधित शेतकऱ्यांना महाबीजकडून संपूर्ण देय रक्कम अदा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला. न्याय मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि पाठपुराव्यामुळे आम्हाला न्याय मिळाला व आर्थिक नुकसान टळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
