चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी दिवंगत प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
या अनुदानासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत शासनाने पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली.
या निर्णयामुळे पिंपळकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, शासनाने दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
