वरोरा तालुक्यातील उखर्डा-शेगाव-नागरी-माढेळी मार्गाची दयनीय अवस्था; सहा वर्षांपासून नागरिकांचा संघर्ष, अभिजित कुडे यांचा प्रशासनाविरोधात अनोखा निषेध
वरोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा प्रश्न पडावा अशी अवस्था वरोरा तालुक्यातील उखर्डा ते उखर्डा पाटी तसेच शेगाव ते शेगाव पाटी-नागरी-माढेळी या मार्गाची झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांनी चक्क रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये झोपून व बसून ‘शयन आंदोलन’ केले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रुग्णांची वाहतूक सुरू असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक आमदार करण देवतळे, खासदार प्रतिभा धानोरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यापूर्वीही झाली विविध आंदोलने; मात्र प्रश्न कायम!
रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात यापूर्वीही अनेकदा अभिनव पद्धतीने आंदोलने करण्यात आली. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहणे, खड्ड्यांमध्ये दिवे लावणे, भजन करणे तसेच रस्त्यात झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक निवेदने आणि आंदोलने करूनही रस्त्याची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ओव्हरलोड ट्रकमुळे रस्त्याची आणखी दुरवस्था
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकची वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले असून मोठमोठे दगड आणि खड्डे उघडे पडले आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकऱ्यांचे हाल
या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करताना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून वाहनांचेही वारंवार नुकसान होत आहे.
अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार!
“गेल्या सहा वर्षांपासून नागरिक या रस्त्यासाठी संघर्ष करीत आहेत. वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही. नागरिकांनी आणखी किती दिवस खड्ड्यांतून प्रवास करायचा? प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांनी दिला आहे.
आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार का, की नागरिकांना आणखी काही वर्षे खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
