चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
राज्यभर पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे १,५५० शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिक्षकांना गैरशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, टीईटीची सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, स्नातक शिक्षकांना समान वेतनश्रेणी देणे तसेच एसआयआर कामांबाबत प्रशासनाकडून होणारी सक्ती थांबविणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनावर अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातही ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व चानकुमार खोब्रागडे, कालिदास येरगुडे, विपिन धावेकर, राजू लांजेकर, अशोक राऊत, किशोर आनंदवार, सतीश बावणे, अरुण खराते, बंडूजी राठोड, अविनाश जुमडे, प्रकाश कुमरे, प्रमोद कांबळे, प्रदीप पावडे, विजय कुमरे, अमोल ठेटे, सुरेश वारोकर आणि नंदकिशोर शेरकी यांनी केले. यावेळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
