मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल–चंद्रपूर मार्गावर रात्रीच्या वेळेस रस्त्यावरच गुरे बसून राहत असल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांना उशिरा दिसत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशावेळी अचानक रस्त्यावर गुरे आल्यास वाहनचालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते.
रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर असूनही नगर परिषद प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने रस्त्यावर फिरणाऱ्या व बसणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करून संबंधित पशुपालकांवर कारवाई करावी आणि वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
