मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील भगतसिंग वॉर्ड, पोस्ट ऑफिससमोरील गल्लीत आज पहाटे अस्वल आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अरुण ऐनप्रेड्डीवार व बादल करपे यांच्या घरासमोरील रिकाम्या जागेतील झुडपांमध्ये अस्वल लपून बसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
पहाटे सुमारे साडेचार वाजताच्या सुमारास अस्वल दिसून आल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अस्वल झुडपांमध्ये असल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतरावरून त्याच्यावर लक्ष ठेवले.
दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची रेस्क्यू टीम सकाळी ७ वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे समजते. मात्र, रेस्क्यू टीम येण्यापूर्वीच अस्वल पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.
अस्वल रहिवासी वस्तीत आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, गर्दीमुळे अस्वल बिथरण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घटनास्थळापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
वनविभागाच्या पथकाकडून अस्वलाला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. घटनास्थळी वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा असून, पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
