बल्लारपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आज दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील सुमारे 100 वर्षे जुने कडुनिंबाचे विशाल झाड अचानक उन्मळून उभ्या असलेल्या बसवर कोसळले. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी दुपारी बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसादरम्यान ग्रामीण रुग्णालय परिसरातील कडुनिंबाचे विशाल झाड उन्मळून टीजी 01 झेड 0041 क्रमांकाच्या आदिलाबाद डेपोच्या बसवर कोसळले.
झाडाच्या मोठ्या फांद्या आणि खोडाचा भाग बसच्या समोरील काचेवर आदळल्याने काच पूर्णपणे फुटली. झाडाचा काही भाग काच फोडून बसच्या आतील भागात घुसल्याने बसचे मोठे नुकसान झाले. मात्र त्या वेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम सुरू केले. काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असून क्रेनच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. या खोदकामादरम्यान झाडाच्या मुळांना धक्का बसून ती कमकुवत झाली असावी आणि त्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे झाड कोसळले असावे, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र दुबार पेरणीचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नसून, समाधानकारक पावसाची प्रतीक्षा शेतकरी अजूनही करत आहेत.
