चंद्रपूर : सतीश आकुलवार मुख्य संपादक )
गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून, जिल्हाभरात धान रोवणीच्या कामांना वेग आला आहे. जून महिन्यात पावसाच्या अनियमिततेमुळे रोपवाटिका तयार होऊनही शेतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने रोवणीची कामे रखडली होती. मात्र सलग पडलेल्या पावसामुळे शेतांमध्ये आवश्यक पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी मोठ्या उत्साहाने रोवणीच्या कामाला लागले आहेत.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. काही भागात रोपवाटिका सुकण्याची भीती निर्माण झाली होती, तर दुबार पेरणी किंवा नव्याने रोपे तयार करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे ही चिंता दूर झाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, मूल, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा आणि सावली तालुक्यांतील शेतांमध्ये धान रोवणीची लगबग सुरू आहे. शेतकरी आणि शेतमजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महिलांचाही मोठा सहभाग असून, पारंपरिक पद्धतीने धान रोपांची लागवड केली जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाची साथ कायम राहिल्यास जिल्ह्यातील धान लागवड मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची शक्यता असून, यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
