मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
बल्लारपूर काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. मेघा भाले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मूल पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
जिल्हा महिला महामंत्री शिवानी संदीप आगडे आणि तालुका महिला मोर्चा महामंत्री सोनिया नितीन गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
निवेदनात, संबंधित वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही राजकीय नेत्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली जाणार नाही, यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची कायदेशीर पडताळणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
