चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे घरात खुंटीवर टांगलेल्या पँटमध्ये शिरलेल्या विंचूने दंश केल्याने 12 वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर झाल्याची धक्कादायक घटना घडली. घरगुती उपचारांमुळे विषाचा प्रभाव वाढल्याने मुलाची प्रकृती अधिकच बिघडली. मात्र डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे त्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले.
अनुप ईश्वर ढोणे (वय 12) असे या मुलाचे नाव आहे. आंघोळ करण्यापूर्वी अनुपने आपली पँट घरातील खुंटीवर टांगली होती. आंघोळ करून आल्यानंतर त्याने तीच पँट घातली. मात्र पँटमध्ये विंचू शिरल्याचे त्याला माहीत नव्हते. पँट घालताच विंचूने त्याला दंश केला. तीव्र वेदनांमुळे अनुप मोठ्याने ओरडल्याने कुटुंबीय धावून आले. पँटची तपासणी केली असता त्यामध्ये विंचू आढळून आला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी सुरुवातीला घरगुती उपचार केले. त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होण्याऐवजी वाढत गेला. दुसऱ्याच दिवशी अनुपची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्याचा रक्तदाब (बीपी) मोजता येत नव्हता, तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी अवघ्या 46 टक्क्यांवर आली होती.
त्यानंतर अनुपला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याला तातडीने चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. चंद्रपूर येथे वेळेत उपचार मिळाल्यामुळे अनुपची प्रकृती सुधारली असून त्याला जीवदान मिळाले.
नागरिकांसाठी आवाहन
विंचू, साप किंवा इतर विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. तसेच घरात टांगून ठेवलेले कपडे, बूट किंवा चप्पल वापरण्यापूर्वी नीट तपासून पाहावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
