लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम
वरोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मराठी माध्यमातील तसेच झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेची भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने गो विथ स्ट्रक्चर उपक्रमाचे प्रणेते गोपाळ गुडधे हे लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रात नियमित स्पोकन इंग्लिशचे मोफत वर्ग घेणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात २ जुलैपासून झाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने नुकतेच सुरू करण्यात आलेल्या ‘लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रा’त सध्या ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यामध्ये झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळावा, मुलाखती, स्पर्धा परीक्षा तसेच दैनंदिन जीवनात इंग्रजीचा प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने गोपाळ गुडधे नियमित मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या गो विथ स्ट्रक्चर या अभिनव अध्यापन पद्धतीमुळे अनेक मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषणात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्याच अनुभवाचा लाभ आता वरोरा शहरातील गरजू विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
याशिवाय या अभ्यास केंद्रात सामूहिक अभ्यास, व्यक्तिमत्त्व विकास, , वाचन संस्कृती, आणि योग शिक्षिका शीतल मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यासाचे वर्गही आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाला चालना मिळणार आहे.
