सिंदेवाही : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) पुलाजवळ गुरुवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास टिप्पर आणि एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, काही जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही तुमसर आगाराची चंद्रपूर–तुमसर मार्गावरील एसटी बस होती. पळसगाव (जाट) पुलाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परची बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमींमध्ये पवणी, नागभीड, तळोधी (बा.) तसेच परिसरातील काही प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
ही घटना सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करून पुढील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
