मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, मुलच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा जप्त करून एका आरोपीला अटक केली.
दि. 3 जुलै 2026 रोजी मौजा बोरचांदली (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथे कैलास बाजीराव मेश्राम (वय 56) यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान घरातून अंदाजे ₹10,600 किमतीचे 40 सिल्व्हर पाऊच (प्रत्येकी 200 ग्रॅम) प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले.
घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांच्या फिर्यादीवरून मुल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 तसेच संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरेकर, पोलीस हवालदार महेश पतरंगे, पोलीस अंमलदार संदीप चौधरी, बल्लमवार तसेच अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांनी संयुक्तपणे पार पाडली.
