चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्गावरील आगडी गावाजवळील जानाळा बीट (कक्ष क्रमांक 714) येथे बुधवारी (दि. 8 जुलै) अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुर्मीळ नर चांदी अस्वलाचा मृत्यू झाला. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या मार्गाने जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अस्वल मृतावस्थेत आढळले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे व सदस्य नाजिश अली यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृत अस्वलाचा ताबा घेत पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.
चंद्रपूर-मूल राष्ट्रीय महामार्ग हा विदर्भातील महत्त्वाचा वन्यजीव भ्रमणमार्ग मानला जातो. हा मार्ग कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य यांना जोडणारा असल्याने या परिसरातून वाघ, बिबट, अस्वल, सांबर, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राणी नियमितपणे स्थलांतर करतात. मात्र, महामार्गावर वन्यजीवांसाठी अंडरपास, ओव्हरपास, वेगनियंत्रण आणि इशारा फलक यांसारख्या आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
याच महामार्गावरील केसलाघाट परिसरात ऑक्टोबर 2025 मध्ये वाघिणीच्या पिल्लाचाही वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रभावी उपशमन उपाययोजना राबविण्यात आलेल्या नसल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, नाजिश अली, इमरान खान तसेच चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे आणि शंभू मडावी उपस्थित होते.
या घटनेनंतर चंद्रपूर-मूल महामार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने अंडरपास, ओव्हरपास, वेगमर्यादा नियंत्रण, चेतावणी फलक आणि इतर उपशमन उपाययोजना राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
