गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गिझर दुरुस्त करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चामोर्शी मार्गावरील आशीर्वाद नगर परिसरात घडली. अमित भोपये (वय ३२, रा. मुरमाडी, ता. गडचिरोली) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप इंदूरकर यांच्या घरातील गिझर बंद पडल्याने त्यांनी दुरुस्तीसाठी अमित भोपये यांना बोलावले होते. अमित घटनास्थळी पोहोचला तेव्हा परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. त्याने त्याच स्थितीत गिझर दुरुस्तीचे काम सुरू केले.
मात्र, दुरुस्ती सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने अमितला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो जागीच कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अमितच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
