नागपूर मार्गावरील काही खाजगी वाहनांवर कारवाईची मागणी; विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील एसटी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मूल मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या तसेच नागपूरहून मूलमार्गे चंद्रपूर, पोंभूर्णा, चामोर्शी आदी भागात ये-जा करणाऱ्या काही खाजगी प्रवासी वाहनांकडून कथितपणे प्रवासी चढ-उतार व बुकिंग होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून, यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO), पोलिस निरीक्षक, मूल पोलिस स्टेशन, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) तसेच एसटी आगारप्रमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मुख्य सेवा रस्त्यावर काही खाजगी प्रवासी वाहने उभी करून प्रवासी भरले जात असल्याने एसटी बसच्या ये-जा मार्गात अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहने थांबवून प्रवासी चढ-उतार व रिव्हर्स घेण्याच्या प्रकारामुळे वाहतूक कोंडी होत असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बसस्थानक परिसरात दररोज शहरासह ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी येत असल्याने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच कथित अनधिकृत प्रवासी वाहतूक, नियमबाह्य वाहनथांबे आणि वाहतूक कोंडीची संयुक्त तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा व इतर लागू नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“नागरिकांच्या जीविताशी कोणतीही तडजोड होऊ नये. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत करावी. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा तालुका प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
निवेदन देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्यासह शहर प्रमुख बादल करपे, चेतन मुंघमोळे, रवी शेरखी, राकेश मोहूरले तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
