मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नगर परिषद, मूलकडून अलीकडेच घनकचरा संकलनासाठी नव्या टेंडरअंतर्गत ई-रिक्षा उपलब्ध करून शहर स्वच्छतेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जाहिरात केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात नगर परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या सरकारी शिलालेखावर शेण पडून असूनही त्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, याच मार्गाने नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी दररोज अनेकदा ये-जा करतात. तरीही या सरकारी शिलालेखाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
नव्या टेंडरमधून घनकचरा संकलनासाठी आणलेल्या ई-रिक्षांचा वापर शहरातील स्वच्छतेबरोबरच अशा सार्वजनिक व सरकारी ठिकाणांची नियमित स्वच्छता करण्यासाठीही व्हायला हवा.
अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कारण स्वच्छतेची सुरुवात स्वतःच्या कार्यालयापासून झाली, तरच शहराला योग्य संदेश जाईल.
स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणाऱ्या सरकारी शिलालेखावर शेण पडून राहते आणि दुसरीकडे स्वच्छतेच्या जाहिराती केल्या जातात, हा विरोधाभास नागरिकांच्या नजरेतून सुटलेला नाही.
नागरिकांनी संबंधित शिलालेख तातडीने स्वच्छ करून भविष्यात अशा प्रकारची दुर्लक्षाची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच सार्वजनिक मालमत्तेची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याची मागणी केली आहे.
