मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर आज सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. बाजार करून दुचाकीने आपल्या स्वगावी बोंडाळा (भूज) येथे परत जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघातात राहुल नारायण पाल (वय 35 वर्षे) आणि त्यांची अवघ्या 3 वर्षीय मुलगी ईशा राहुल पाल यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाल हे आपल्या मुलीसोबत दुचाकीने बाजार करून बोंडाळा (भूज) येथे आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की, राहुल पाल आणि त्यांची चिमुकली मुलगी ईशा यांना गंभीर दुखापत झाली आणि दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
या अपघातामुळे पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बापासोबत अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.
