मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नगर परिषद मुल येथील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर करत मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून सेवा बजावत असूनही कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सफाई कर्मचारी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून नगर परिषदेत सेवा देत आहेत, मात्र त्यांना अद्याप कायमस्वरूपी करण्यात आले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा, अशी प्रमुख मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांशी गैरव्यवहार होऊ नये तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला अन्यायकारक पद्धतीने कामावरून कमी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी, नगर परिषद मुल तसेच तहसीलदार, तहसील कार्यालय मुल यांना देण्यात आली आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या प्रशासनासमोर सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
