नागपूर : (प्रतिनिधी)
अखिल भारतीय बेलदार समाज, नागपूर यांच्या वतीने नागपूर सुधार प्रन्यास सभागृह, गणेश नगर, नागपूर येथे बेलदार समाजातील दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार, कौतुक व अभिनंदन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि पालकांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विदर्भातील विविध जिल्ह्यांतून समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत स्व. राजेश मारगमवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अण्णा गुंडलवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गजानन कोटेवार, प्रमुख वक्त्या प्राचार्या अर्चना जैनाबादकर मॅडम, डॉ. मनोहर मुद्देशवार तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. उल्हास जंगीटवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. सुषमा ओझा यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुकुंद अडेवार यांनी मांडत या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती ललिताताई मामीडवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थी आणि पालकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्या अर्चना जैनाबादकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मोबाईलचा मर्यादित व विधायक वापर, पालकांनी मुलांना देण्यात येणारे संस्कार, घरातील सकारात्मक वातावरण, मुलांसमोर पालकांचे आदर्श वर्तन तसेच शिस्तबद्ध जीवनशैली या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या प्रगतीस अडथळा ठरू शकतो, त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांशी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
मा. गजानन कोटेवार यांनी “विद्यार्थी आणि पुस्तक” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. पुस्तक हेच विद्यार्थ्याचे खरे मित्र असून नियमित वाचन, ज्ञानाची ओढ आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच जीवनात मोठे यश मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या युगात केवळ गुण मिळविणे नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकास, मूल्य शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा. उल्हास जंगीटवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, रोजगार, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
समाजातील युवकांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. मनोहर मुद्देशवार यांनीही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, सामाजिक जबाबदारी आणि समाजाच्या प्रगतीत शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
मंचावरील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देत पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
या सोहळ्यात समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
व मा. रुपेश कुचेवार, सौ. प्राची गांगुलवार यांना संशोधन केल्यामुळे व सौ अर्चना मंकिवार हिला वकील डिग्री पूर्ण केल्याने सन्मान करण्यात आला.
तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सायकली भेट देण्यात आल्या. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय बेलदार समाज, नागपूर चे सर्व पदाधिकारी, बेलदार सखी मंच, बेलदार महिला आघाडी, मैत्रेय बेलदार संघटना तसेच विविध स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आदी जिल्ह्यांतील समाजबांधव, पालक, विद्यार्थी, महिला, युवक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना शिक्षण, संस्कार आणि समाजएकतेचा संदेश देणारा हा सोहळा बेलदार समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
डॉ.रविद्र सकुंदरवार,विनोद आकुलवार, अरुण आकुलवार, रमेश गट्टेवार,अनिल बोरगमवार ,डॉ विवेक अनंतवार, रविंद्र आकुलवार, अँड सुभाष बोंडेकर, राजु फेदेवार, पंकज अनंतवार, अशोक बलगेवार,अजय बेझलवार, मुकेश तेल्लारवार, अविनाश बोरगमवार, श्रीमती ललिताताई मामीडवार, विभाताई गुंडलवार,दिनेश वर्धेवार,अशोक आकुलवार, बेलदार तेलगीपुरा आखाडा वर्धा, सौ. अर्चना सिंगलवार, डॉ. अजय बेझलवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
