मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत आकापूर एमआयडीसी रोड परिसरात कत्तलीच्या उद्देशाने सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश वाहतुकीवर मूल पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत 9 गोवंश जनावरे, एक छोटा हत्ती वाहन आणि एक मोबाईल असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे व सहकारी गस्तीवर असताना आकापूर एमआयडीसी रोडवरील उमा नदी टी-पॉईंट परिसरात संशयास्पदरीत्या उभे असलेले एमएच 27 डीटी 1320 क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन आढळले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता 9 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयतेने बांधून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान ही जनावरे आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कोणताही वैध परवाना आढळून आला नाही.
या प्रकरणी भूषण तिरुपती जांभुळकर (वय 31, रा. मोठे हनुमान, पंचशील चौक, बंगाली कॅम्पजवळ, चंद्रपूर) याला अटक करण्यात आली.
जप्त मुद्देमाल
9 गोवंश जनावरे – अंदाजे किंमत ₹67,000
छोटा हत्ती वाहन (MH 27 DT 1320) – किंमत ₹4,00,000
ओप्पो कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल – किंमत ₹8,000
एकूण जप्त मुद्देमाल : ₹4,75,000
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 चे कलम 9, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, 1960 चे कलम 11(1)(a), (d), (f) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अन्वये मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे, पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे व त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.
