
राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असून ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता आमदारदेखील फुटणार असल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे महत्त्वाची घडामोड घडली आहे. शरद पवार गटाच्या माजी आमदाराला केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. हे खातं अमित शाह यांच्या अखत्यारीत असल्यानं चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांना थेट केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. सुनील भुसारा यांची ‘भारतीय सहकारी संघ’ (NCUI – National Cooperative Union of India) या देशातील सर्वोच्च सहकार संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण राष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्रातून एकमेव संचालक म्हणून शरद पवार गटाच्या या माजी आमदाराची निवड झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर सुहास भुसरा यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. सुहास भुसरा हे विक्रमगडचे माजी आमदार आहेत.
