नवी दिल्ली : (विशेष प्रतिनिधी)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला आहे. NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि त्यानंतर देशभरात निर्माण झालेला वाद, तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट करत म्हटले की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने कार्यरत राहिले आहेत.
आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया असते,” यावर त्यांचा नेहमीच दृढ विश्वास राहिला आहे. शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाच्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
