कापूस वेचणीसाठी शेतात गेल्या असताना काळाचा घाला; परिसरात भीतीचे वातावरण
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील ताडाळा येथील रहिवासी संगीता कृष्णा पेडूकर (वय ५५ वर्षे) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ताडाळा परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता पेडूकर या कापूस वेचणीच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत अन्य महिला शेतमजूरही कामावर होत्या. दरम्यान, सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास ताडाळा नदीकिनारी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सोबत काम करणाऱ्या महिला मजुरांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती गावाtaत समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संगीता पेडूकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मूल तालुक्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतात काम करताना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वनविभागाने या परिसरातील वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
