चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही नेत्यांमधील मतभेद कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी झालेली निवड कायम ठेवल्याने वडेट्टीवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपद सोडावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला पुन्हा वेग आला आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीपासून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले होते. हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा होती. तसेच प्रियांका गांधी यांनीही ‘डू हेल्दी पॉलिटिक्स’चा सल्ला देत दोन्ही नेत्यांमधील मतभेद संपवण्याची सूचना केली होती.
यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सर्व मतभेद मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र, गटनेतेपदाच्या वादावरून पुन्हा निर्माण झालेल्या संघर्षामुळे या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
