३० बाय ३० फुटांच्या हायटेक पिंजऱ्यात अडकला; महिनाभरापासून दहशतीत असलेल्या गावकऱ्यांना मोठा दिलासा
सावली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड (खुर्द) उपवनक्षेत्रातील सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि तीन गुराख्यांचा बळी घेणाऱ्या टी-१२२ वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गर्वाला जंगल परिसरात लावलेल्या ३० बाय ३० फुटांच्या हायटेक पिंजऱ्यात हा वाघ अडकला. वाघ जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून या वाघाला पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने विशेष नियोजन केले होते. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या नेतृत्वाखाली आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर आणि ब्रह्मपुरी वनविभागाचे जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्या संकल्पनेतून ३० बाय ३० फुटांचा विशेष हायटेक पिंजरा तयार करण्यात आला. हा पिंजरा सावली वनपरिक्षेत्रातील सिर्सी, उपरी आणि सामदा वनबीट परिसरात बसविण्यात आला होता. वाघाच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
या मोहिमेत नऊ गरुडा सीसीटीव्ही कॅमेरे, २० ट्रॅप कॅमेरे आणि तीन लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. तब्बल ६० वनकर्मचारी आणि वनमजूर वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. अनेक दिवसांच्या नियोजनानंतर अखेर शनिवारी सकाळी या मोहिमेला यश आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखालीही मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर, जीवशास्त्रज्ञ नारनवरे, क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवार, शूटर प्रदीप कोडापे यांच्यासह सामदा, उपरी, नवेगाव, सिर्सी आणि चारगाव येथील वनरक्षक सहभागी झाले होते. तसेच आरआरयू पथक चंद्रपूर, पीआरटी चमू, एसटीपीएफ चंद्रपूर आणि स्थानिक वनमजुरांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
महिनाभरापासून वाघाच्या दहशतीखाली असलेल्या गावकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून, वनविभागाच्या या मोहिमेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते.
