बोनस न मिळाल्याने पाच दिवसांपासून सफाई कामगारांचे काम बंद; स्वतः मजूर आणि ट्रॅक्टर लावून घरोघरी कचरा संकलन
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सध्या दिवाळीचा सण सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मूल नगर परिषद क्षेत्रात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कंत्राटदाराकडून कंत्राटी सफाई कामगारांना दिवाळीचा बोनस न मिळाल्याने मागील पाच दिवसांपासून शहरातील साफसफाईचे काम बंद आहे. परिणामी शहरातील विविध भागांत कचरा साचत असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत मूल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक राहुल प्रेमलवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या कामावरील मजूर सोबत घेऊन स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन कचरा जमा केला. दिवाळीच्या सणात नागरिकांना स्वच्छ परिसर मिळावा, या उद्देशाने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छतेचे काम केले.
एकीकडे बोनसच्या प्रश्नावरून सफाई कामगारांचे काम बंद असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली असताना, दुसरीकडे नगरसेवक राहुल प्रेमलवार यांनी स्वतःच्या स्तरावर केलेल्या या प्रयत्नाची मूल शहरात चर्चा होत आहे.
नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे किती महत्त्वाचे आहे, हे या उपक्रमातून दिसून आले. राहुल प्रेमलवार यांच्या या पुढाकारातून इतर नगरसेवकांनीही बोध घेऊन आपापल्या प्रभागातील स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, सफाई कामगारांच्या बोनसचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मूल शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत सुरू करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही होत आहे.
