५८ मतदान केंद्रांवर मतदानाची तयारी पूर्ण; पदवीधर कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ३२ हजार २६२ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी जिल्ह्यात ५८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
जिल्ह्यात २० हजार ९०५ पुरुष आणि ११ हजार ३५७ महिला मतदारांची नोंद आहे. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाने दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी या सवलतीची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ५८ मतदान केंद्रांचे नियंत्रण नऊ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. ब्रह्मपुरी उपविभागात सर्वाधिक ११ मतदान केंद्रे, वरोरा येथे ९, चंद्रपूर येथे ८, मूल येथे ७, तर चिमूर, बल्लारपूर आणि राजुरा येथे प्रत्येकी ६ मतदान केंद्रे आहेत. कोरपना येथे ५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक आढाव्यानुसार, जिल्ह्यात संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची नोंद नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
