गोंदिया : कोमेश्वर डोंगरवार (तालुका प्रतिनिधी)
! चामेश्वर गहाणे मैदानात |
कोहळी संघर्ष मंचाने उमेदवारी जाहीर करून दिनांक 06 ऑक्टोंबर 2026 ला उमेदवारी अर्ज केले दाखल
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आले असून कोहळी संघर्ष मंचाच्या वतीने चामेश्वर गहाणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
चामेश्वर गहाणे हे भाजपचे ओबीसी आघाडीचे माजी विदर्भ सहप्रमुख राहिले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.
गहाणे यांच्या उमेदवारीमुळे कोहळी समाजासह विविध सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये कोहळी समाजाचा प्रभाव असल्याचे राजकीय चर्चेत बोलले जात आहे.
दरम्यान, पदवीधर मतदारसंघातील शिक्षक, बेरोजगारी आणि नोकरीतील आरक्षण यांसारखे मुद्देही आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
संघर्ष मंचाने चामेश्वर गहाणे यांचे नाव पुढे केल्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून वारंवार कोहळी समाजावर होत असलेल्या उपेक्षेमुळे कोहळी समाजातील लोक एक होऊन आपल्या न्याय व हक्कासाठी लढणार हे चित्र स्पष्ट दिसत आहे. याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात कोणत्या पक्षाचा उमेदवार मैदानात उतरतो आणि कोणत्या सामाजिक व राजकीय समीकरणांना पाठिंबा मिळतो, यावर निवडणुकीची चुरस मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात चामेश्वर गहाणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत निश्चितच वाढली आहे.
