कुरली गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू; परिसरात काही काळ भीतीचे वातावरण, जीवितहानी नाही
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असतानाच आज चंद्रपूर जिल्ह्यालाही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4 वाजून 15 मिनिटे आणि 14 सेकंदांनी भूकंपाचा धक्का जाणवला. चंद्रपूर शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरली गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 5 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातही गेल्या काही दिवसांत वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले असून काही घरांना तडे गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भूकंपाच्या घटनेने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात जाणवलेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
