वरोरा तालुक्यातील घटना; मृत वाघ नर असून वय अंदाजे साडेतीन वर्षे, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
वरोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
तालुक्यातील फत्तापूर आणि बारवा या दोन गावांच्या परिसरातील कालव्याच्या (कॅनल) पाण्यात वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. सोमवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून फत्तापूर, बारवा, वडगाव आदी गावांच्या शेतशिवारात या वाघाचा वावर होता. तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील काही गावांच्या शेतशिवारातही हा वाघ फिरत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी फत्तापूर आणि बारवा गावांच्या परिसरातील कॅनलच्या पाण्यात या वाघाचा मृतदेह आढळून आला. मृत वाघ नर असून त्याचे वय अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वाघाचा मृत्यू कालव्याच्या पाण्यात बुडून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी यांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वनविभागाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
