चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सणासुदीच्या आणि गर्दीच्या हंगामात खाजगी प्रवासी बसेसकडून अवाजवी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
सणासुदीच्या काळात पुणे, नागपूर, अमरावती, हैदराबाद, यवतमाळ, नाशिक आदी शहरांकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसना मोठी मागणी असते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही खाजगी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडेवाढ केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्र. 149/2011 मधील निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय काढून खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच स्वरूपाच्या बसच्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे भाडे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे.
या माध्यमांद्वारे करा तक्रार
शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवाशांना खालील माध्यमांद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे.
व्हॉट्सॲप क्रमांक : 7588473434
ई-मेल : dyro.34-mh@gov.in
ई-मेल : dytcinspect.tpt-mh@gov.in
प्रवाशांनी अवाजवी भाडे आकारणीविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तसेच सर्व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
