चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका बांबू तोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कलामसिंग उईके (वय ६४) असे मृत कामगाराचे नाव असून, ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कलामसिंग उईके हे जुनोना जंगल परिसरात बांबू तोडणीचे काम करत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेनंतर जंगल परिसरात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांबू तोडणीसह विविध कामांसाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका कायम असतो. त्यामुळे मजुरांच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग आणि संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सुरू असून, अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जंगलात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
