चिमूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले शिळे अन्न खाल्ल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे १३ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास सुरू झाल्याने बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक कार्यक्रमानंतर उरलेले अन्न खाल्ल्यानंतर काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, जुलाब आणि तापाची लक्षणे जाणवू लागल्याने जांभूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रुग्णांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
या घटनेत एकूण १३ जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून, त्यापैकी १० जणांची प्रकृती सुधारली आहे. तर तिघांना अद्याप तापाचा त्रास जाणवत असून, त्यांच्यावर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले अन्न खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याने अन्नाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न साठवणूक आणि वितरण करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
