दुचाकींच्या पेट्रोल टाकी व सीटमध्ये लपवून दारूची वाहतूक; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या पद्धतीने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन दुचाकींसह देशी दारू असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित दुचाकीस्वारांना थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी तानाजी नानाजी पेंदोरकर (वय ३२) आणि सौरभ प्रकाश महाजनवार (वय १९), दोघेही रा. व्याहाड (बु.), ता. सावली, जि. चंद्रपूर, यांच्या दुचाकींच्या पेट्रोल टाकी व सीटमध्ये लपवून ठेवलेली देशी दारू आढळली.
दोन्ही दुचाकींमधून प्रत्येकी २०० नग, अशा एकूण ४०० नग ९० मिलीच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत ३२ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकींची अंदाजित किंमत २ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्याच्या सीमांवर २४ तास नाकाबंदी करून अवैध व्यवसायांना आळा घालण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.
