सावली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सामदा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी-१२२ वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. तब्बल ३० बाय ३० फुटांचा विशाल पिंजरा उभारण्यात येत असून, राज्यात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
टी-१२२ वाघाने गेल्या काही दिवसांत तीन जणांचा बळी घेतला असून, एका व्यक्तीला जखमी केले आहे. या वाघाला पकडण्यासाठी डार्टच्या साहाय्याने बेशुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यात यश आले नाही. मानवी हालचालींची चाहूल लागताच हा वाघ घटनास्थळावरून निघून जात असल्याने त्याला पकडणे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर वाघाच्या हालचालींचा अभ्यास करून आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून त्याला जेरबंद करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यासाठी ३० बाय ३० फुटांचा विशाल पिंजरा उभारण्यात येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी दिली.
या अभिनव प्रयोगामुळे टी-१२२ वाघाला पकडण्यात वनविभागाला यश मिळते का, याकडे सामदा परिसरातील नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वाघाच्या संभाव्य हालचालींच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे.
