बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील घटना; जखमी बालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
बल्लारपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील चुनाभट्टीजवळील वळण रस्त्यावर शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) रात्री सुमारे १०.४५ वाजताच्या सुमारास बिबट्याने नऊ वर्षीय बालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागरिकांनी केलेल्या आरडाओरडामुळे बिबट्याने बालकाला सोडून दिल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्तिक जाधव (वय ९, रा. हैदराबाद) हा आपल्या आत्याच्या घरी बल्लारपूर येथे आला होता. शनिवारी रात्री तो कुटुंबीयांसोबत माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने कार्तिकला जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून आत नेण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. लोकांचा आवाज ऐकून बिबट्याने भिंतीवरून उडी मारताना बालकाला सोडून दिले. त्यानंतर बालकाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर वनविभागाचे आरएफओ राजेंद्र घोरुडे आणि बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे ११.३० वाजता कार्तिक बॉटनिकल गार्डनच्या भिंतीजवळ जखमी अवस्थेत आढळून आला.
बिबट्याच्या हल्ल्यात कार्तिकच्या मानेवर जखमा झाल्या असून, त्याला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावरच बिबट्याने बालकावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून वनविभागाने गस्त वाढवावी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
