
पुण्यातील केतन अग्रवाल हत्यांकाडात दररोज नवनवे आणि थक्क करणारे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. चेतनच्या जोधपूरमधील काही मित्रांनीच त्याचं गुपित उघड केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे केवळ रिलेशनशिपमध्येच नव्हते, तर त्यांनी लग्नानंतर पुण्यातून कायमचं थेट राजस्थानला जाण्याचा मोठा प्लॅन आखला होता.
दुकान आणि ऑफिस समोरासमोर
मूळचा जोधपूरच्या पलासनी गावचा असलेला चेतन चौधरी हा पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. पुण्यात जिथे चेतनच्या वडिलांचे किराणा दुकान आहे, अगदी त्याच्या समोरासमोरच सिया गोयलच्या वडिलांचे ऑफिस आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना चेतनला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड होती. याच दरम्यान तो सियाचा भाऊ साहिल याच्या संपर्कात आला. साहिलच्या माध्यमातूनच त्याची ओळख सियाशी झाली आणि पाहता पाहता या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
